हैशटैग
#SamantbhadraJiMaharaj1891VardhamanSagarji(ShantiSagarji)
Acharya Shri 108 Samantbhadra Maharaj ji was born on 19 December 1891 in Karmole,Dist-Solapur,Maharashtra.His name was Devchand Kasturchand Shah in Planetary state. He received initiation from Muni Shri 108 Vardhaman Sagar ji Maharaj(South)(Elder brother of Acharya Shri Shanti Sagar ji).
आप मौन साधक थे।आपने युवक जीवन कल्याण के लिए कई आश्रम की स्थापना कराई थी।कारंजा,कुम्भोज ,खुरई गुरुकुल में आज भी बाल्याश्रम चल रहे हैं जहाँ से संस्कार और प्रतिभा प्रदान की जाती है।
Acharya Shri 108 Devendra Kirti Ji Maharaj | ||
1.Charitrachakravarti Acharya Shri Shanti Sagar Ji Maharaj 1872 | ||
Acharaya Vardhaman Sagarji Maharaj (ShantiSagarji) |
प. पू. गुरुदेव श्री समंतभद्र महाराज : एक अनुकरणीय जीवनकार्य
भारत भूमी ही एक संतांची पावन भूमी आहे. अनेक सत्पुरुषांनी येथे जन्म घेतला आणि आपले व त्यासोबतच इतरांचेही कल्याण केले. जैनधर्माचा विसाव्या शतकातील इतिहास पाहता दोन व्यक्तींना आपण कदापी विसरू शकणार नाही. एक म्हणजे चारित्रचक्रवर्ती आचार्य श्री शांतिसागर महाराज, ज्यांनी विलुप्त नग्न दिगंबर मुनिपरंपरेला पुनर्जीवित केले आणि दुसरे म्हणजे प. पू. गुरुदेव श्री समंतभद्र महाराज ज्यांनी कालकवलीत गुरुकुल शिक्षण प्रणालीचा आविष्कार करून लौकिक शिक्षणासोबतच नैतिक व आध्यात्मिक संस्काराची प्रतिष्ठापना केली. लौकिक शिक्षण हे मानवी जीवनाचे एकांगी शिक्षण होय. नैतिक व धार्मिक शिक्षणाशिवाय लौकिक शिक्षण आंधळेच आहे. आधुनिक गुरुकुल शिक्षण प्रणालीचा आविष्कार करणारे गुरुदेव श्री समंतभद्र महाराज हे एक संस्कारप्रधानी शिक्षणमहर्षी होते.
बालपण व पारिवारिक परिचय
गुजरातमधील विरगाव जिल्ह्यातील कडीयाद्रू या गावातून महाराष्ट्रात गुरुदेवश्रींचे आजोबा श्री. खेमचंदजी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या गावी स्थलांतरित झाले. तेथे त्यांनी व्यापारधंदा व शेती व्यवसायात चांगला जम बसवला होता. त्यांचे सुपुत्र श्री. कस्तुरचंद दशाहुमड दिगंबर जैन समाजातील एक सुप्रतिष्ठित मान्यवर घराणे होय. मुळातच सुशिक्षित व सुसंस्कारित असे उच्च कुल होते. धार्मिकता हा या कुळाचा अविभाज्य अंगच होता. श्री. कस्तुरचंद यांनी फलटण निवासी श्री गुलाबचंद पद्मचंद दोशी यांची कन्या कंकुबाई हिच्याशी विवाह केला. या दांपत्यांना रामचंद्र, शिवलाल, देवचंद व हिराचंद ही चार मुले आणि फुलूबाई. चंचलाबाई. मथुराबाई या तीन कन्या जन्मास आल्या.
गुरुदेवश्री समंतभद्र महाराज यांचे बालपणीचे नाव देवचंद असे होते. त्यांचे वडील बंधू रामचंद्र भाई हे एक उत्तम वैद्यकीय व्यवसाय करणारे प्रसिद्ध वैद्य होते. त्यांनी अहर्निशं सेवामहे या ब्रीदवाक्यानुसार व्याधी पीडित रुग्णावर उपचार करण्यास सदैव तत्पर असत. आजारी लोकांच्यासाठी ते देवदूतच बनत असत. अनेक गुरुकुलातील मुलांच्या करिता त्यांनी नि:स्पृहवृत्तीने सेवायोग देऊन सुदृढ व स्वस्थ विद्यार्थी बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
गुरुदेवश्रींचे दुसरे मोठे बंधू श्री शिवलालभाई हे व्यापारधंद्यात चाणाक्ष बुद्धी, सचोटी व कार्यकौशल्य या सद्गुणामुळे चांगला जम बसवला होता. एकदा ते प्रसंगवश दुधनीला गेले असता तेथे त्यांच्या मेव्हण्यांच्या सल्ल्यानुसार तेथेच नवीन व्यवसाय सुरू केला आणि संपूर्ण कुटुंबाला दुधनीस बोलावून घेतले. हे बाहुबली गुरुकुलात देखील बराच काळ राहत होते. विशेष करून दशलक्षण पर्वाच्या वेळी लहान-लहान कथेच्या माध्यमातून गुरुकुलातील मुलांच्यावर उत्तम संस्कार करण्यास पारगामी होते. गुरुदेवश्रींच्या सोबत चांगली तत्त्वचर्चा करीत असत. सन्मति या मासिकातून त्यांच्या अनेक कथा व तत्व चर्चा प्रकाशित झाले आहेत.
पूज्य गुरुदेवश्री यांचा जन्म मार्गशीर्ष वद्य ४, दि. 19 डिसेंबर 1891 रोजी झाला. ते श्री. कस्तुरचंद शेठजींचे तिसरे सुपुत्र होते. त्यानंतर जन्मलेले चौथे सुपुत्र श्री. हिराचंद हे वयाच्या सहाव्या वर्षीच सम्मेद शिखरजीच्या यात्रेला जाताना प्लेगच्या साथीमुळे दिवंगत झाल्याने देवचंद हे सर्वात धाकटे ठरले, म्हणून बालपणापासून बालक देवचंद यांच्यावर मात्यापित्याने चांगले संस्कार केले. मंदिरासमोरच घर असल्याने दररोज सकाळी देवदर्शन, पूजन, भक्ती आणि सायंकाळच्या वेळी वडिलांच्या सोबत पुराणवाचन हे नित्यनियमाने घडत असत. हे देवचंद स्वतः पुराण वाचत असत आणि वडील कस्तुरचंद हे त्याचे विश्लेषण करून लोकांना सांगत असत. अशाप्रकारे बालमनावरील उत्तम संस्कार हाच त्यांच्या आध्यात्मिक जीवनयात्रेचा पाया ठरला.
लौकिक व धार्मिक शिक्षण
करमाळा येथे गुरुदेवश्रींचे प्राथमिक शिक्षण झाले. दुधनीला स्थलांतरित झाल्याने प्राथमिक शिक्षण दुधनीला पूर्ण झाले घरची परिस्थिती चांगली असल्याने दोन मोठे बंधू वेगवेगळ्या व्यवसायात प्रविष्ट झाल्याने एकाने तरी चांगले शिक्षण घ्यावे, या हेतूने गुरुदेवश्रींना माध्यमिक शिक्षणाकरिता सोलापूर येथील नॉर्थ कोर्ट हायस्कूल या सरकारी शाळेत दाखल करण्यात आले. श्री. कस्तुरचंद यांचे आते भाऊ श्री मोतीचंद हे एक उत्कृष्ट व नामवंत वकील होते. ते सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते असल्याने इंग्रज सरकारने रावबहादूर हा किताब बहाल केला होता. शिवाय ते सोलापूर नगर परिषदेचे अध्यक्षही होते. त्यांच्या घरी श्री. देवचंद यांच्या निवासाची सोय करण्यात आली. येथेच सोलापूर जिल्ह्यातील करकंब या गावचे मोतीचंद पदमसी यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री झाली. तसेच वालचंद कोठारी, वालचंद यांच्या जीवराज वालचंद, रावजी देवचंद, वालचंद देवचंद, माणिकचंद रावसाहेब निम्बर्गीकर, रामचंद्र राजवाडे इत्यादी सर्व बालचमूंची मैत्री जमल्याने गुरुदेवांनी एक शरीर सुधारणेच्छु बाणेकरी तालीम सोलापूर या नावाची 1906 च्या सुमारास एक तालीम उभारली. येथे दररोज व्यायामासोबतच विविध खेळ आणि पाठशाळा चालवण्यास सुरुवात केली. कालांतराने दि. 26 फेब्रुवारी 1908 रोजी सोलापूर येथे लोकमान्य टिळकांचे आगमन झाले असता त्यांच्या हस्ते बालोत्तेजक समाज या संघटनेची स्थापना केली. त्यावेळी या सर्व नवयुवकांच्या समोर लोकमान्य टिळकांनी रामदास या विषयावर व्याख्यान देऊन समाज व देशसेवा करण्यास सर्वांना उद्युक्त केले.
या बाल संघटनेच्या माध्यमातून एकंदरीत देशसेवा, समाजसेवा, धर्मसेवा व त्याचबरोबर आत्मसेवा ह्या सेवाचतुष्टयींचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. यादरम्यानच बालसखा मोतीचंद यांच्यासोबत कुंथलगिरी येथे जाऊन स्वयंस्फूर्तीने शिक्षण संपेपर्यंतचे ब्रह्मचर्य व्रत स्वीकारले. असे बालपणी बुद्धी होणे खरोखरच थोर महापुरुषांचे लक्षणच होय.
महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथील विल्सन कॉलेजमध्ये दाखल होऊन पुढील महाविद्यालय शिक्षण घेत असताना हिराचंद गुमानजी जैन बोर्डिंगमध्ये डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या नवयुवकांच्या संपर्कात आले. कर्मवीर अण्णांच्या सोबत 1910 साली श्रवणबेळगोळ येथील महामस्तकाभिषेकात स्वयंसेवकाची भूमिका पार पाडल्यानंतर पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. इंग्रजी व संस्कृत हे त्यांच्या महाविद्यालयीन अभ्यासाचे विषय होते. विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या धर्मसभेत सहभागी होणे हा त्यांचा आवडता छंद होता. सांगली येथील द. भा. जैनसभेच्या तेराव्या वार्षिक अधिवेशनात सहभागी होऊन जयपूर येथील जैन धर्माचे गाढे अभ्यासक व शिक्षणप्रेमी पं. श्री अर्जुनलाल शेठी यांचे व्याख्यान ऐकून त्यांच्या जवळून धार्मिक शिक्षण घेण्यासाठी स्वतः देवचंद, मोतीचंद, माणिकचंद, वालचंद देवचंद व वालचंद पद्मसी कोठारी हे पाच चंदमंडळी जयपूरला धार्मिक शिक्षणासाठी गेले होते.
मित्रमंडळींची ताटातून
जयपूर येथे शिक्षण घेत असताना देवचंद यांचे बालसखा मोतीचंद हे जहाल मतवादी क्रांतीकारक होते. त्यामुळे ते तेथील रजपूत क्रांतिकारकांशी मिळून इंग्रजाविरुद्ध अनेक कटकारस्थान करीत होते. याचा सुगाव इंग्रजांना लागल्याने हे सर्व चंदमंडळी ज्या जैन बोर्डिंगमध्ये शिकत होते. तेथे अनेक निर्बंध लादण्यात येऊ लागले. एके दिवशी निमच येथील एका मठावरती या सर्व क्रांतिकारकांनी हल्ला केला आणि केवळ संपत्ती घेऊन जाण्याचा विचार होता, पण त्यात त्या मठाचे अधिकारी असणाऱ्या मठाधीशाचा खून झाला. त्यामुळे हे जैन बोर्डिंग बंद झाले. त्यातच प्रमुख धर्माध्यापक पंडित श्री अर्जुन लाल सेठी व मोतीचंद हे दोघेही इंदोरला गेले. तेव्हा देवचंद आणि वालचंद देवचंद हे दोघेही लौकिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी बडोदा येथे गेले. जयपुरमध्ये सुमारे दीड वर्षाचा काळ गेला. त्यानंतर बी. ए.ची परीक्षा देण्याकरिता मुंबईतील जैन बोर्डिंगमध्ये दाखल झाले आणि येथेच त्यांनी 1916 साली इंग्रजी व संस्कृत या विषयातून मुंबई विद्यापीठाची बी. ए.ची पदवी घेतली.
आध्यात्मिक जीवनयात्रा- ब्रह्मचर्यातील विशुद्ध धर्मसाधना
सुमारे 42 वर्षे त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचे अखंड पालन केले. या काळात बलोपासना सोबत आध्यात्मिक ज्ञानोपासनाही केली. अनेक ग्रंथांचे निरंतर वाचन करणे, देवपूजा, संयमाचे पालन, एकाशन, उपवास, मर्यादित आहार, प्रतिदिवस सामायिक पठण, विविध मंत्रजाप अशा विविध धर्मकार्यातून विचारांचे संतुलन साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बालपणापासून धार्मिक वृत्तीची ओढ असल्याने धर्म व सदाचार हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य अंग होता.
क्षुल्लक दीक्षा
सन 1933 मध्ये चारित्रचक्रवर्ती आचार्य श्री शांतिसागर महाराज यांचा राजस्थान येथील ब्यावर या नगरीमध्ये चातुर्मास संपन्न होत होता. तेथे शास्त्री परिषदेच्या निमित्ताने ब्र. देवचंद यांचा आचार्यश्रींच्या दर्शनाकरता जाण्याचा योग आला तेव्हा आचार्यश्री मृदुहास्य करीत म्हणाले, "ब्रह्मचारीजी, आता पिंछी केव्हा येणार ?" जणू आचार्यांनी त्यांच्या मनातील भाव ओळखले होते. ब्र. देवचंद यांनी लगेच होकार दिला, पण गुरुकुलाच्या कार्यात सल्ला देण्याची अनुमती मागितली. काही दिवस विचार विमर्श करून मार्गशीर्ष शुद्ध ४, सोमवार दि. 20 नोव्हेंबर 1933 रोजी क्षुल्लक पदाची दीक्षा दिली आणि समंतभद्र महाराज असे त्यांचे नामकरण झाले. ही एक उत्कृष्ट श्रावकाची दीक्षा होय. केवळ एक लंगुटी आणि अंगावर ओडण्यापुरते एक दुपट्टा इतकाच परिग्रह बाळगला अन्य सर्व परिग्रहाचा परित्याग केला. अशा प्रकारे सुमारे 19 वर्षे त्यांनी धर्माराधना केली.
मुनिदीक्षा
जर सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्त व्हावयाचे असेल तर मुनिधर्म अंगीकार केल्याशिवाय संसार दु:खातून मुक्ती शक्य नाही हे गुरुदेवश्रींनी बालपणापासून जीवनाचे सत्य जाणले होते; म्हणून निरंतरच्या आत्मसाधनेमुळे भोगातून त्यागाकडे, असंयमातून संयमाकडे, अज्ञानातून आत्मज्ञानाकडे, शुभातून शुद्धीकडे त्यांचा जीवनप्रवास वेगाने चालला होता. याचेच सुफल असे की वयाची 61 वर्षे पूर्ण होण्यास अवघे चार दिवस शिल्लक असतानाच शुक्रवार दि. 28 नोव्हेंबर 1952 रोजी त्यांनी मुनिदीक्षा घेतली. श्री अतिशय क्षेत्र बाहुबली येथे मुनी 108 श्री वर्धमानसागरजी महाराज यांच्या शुभ हस्ते हा दीक्षा समारंभ संपन्न झाला. सुमारे 36 वर्षे त्यांनी मुनिधर्माचे निरतीचार पालन करीत आत्मसाधना केली. श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या दिवशी दि. 18 ऑगस्ट 1988 रोजी त्यांनी अत्यंत समता भावपूर्वक समाधी साधली आणि आपल्या मानव जीवनाची सार्थकता केली.
शैक्षणिक योगदान
कारंजा : गुरुकुल शिक्षणाची मुहूर्तमेढ
भट्टारक श्री वीरसेन महाराजांच्या जवळ समयसार हा ग्रंथ शिकण्यासाठी देवचंद यांना कारंजा येथे जाण्याची खूप तीव्र इच्छा होती. योगायोगाने श्री प्रद्युम्नसावजी डोणगावकर यांची विधवा बहीण बजाबाई ह्या मुंबई येथील जैन बोर्डिंगमध्ये राहत होत्या. त्या एकाकी जात होत्या; म्हणून ब्र. कंकूमावशी यांनी त्यांच्यासोबत देवचंद यांना पाठवले. कारंजा येथे धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास करता करता तेथील अनेक दानशूर श्रेष्ठीवर्गाशी परिचय घडला आणि धार्मिक लोकांच्या शिवाय धर्म टिकत नाही. धार्मिक लोकांना प्रोत्साहित करण्यासाठीच "न धर्म धार्मिकैर्विना" हे ध्येयवाक्य समोर ठेवून श्री महावीर ब्रह्मचर्याश्रम कारंजा हे गुरुकुल सुरु केले. प्राचीन काळातील गुरुकुल शिक्षण पद्धतीला आधुनिकतेची जोड देऊन इसवी सन 1918 साली अक्षय तृतीया या दानतीर्थप्रवर्तनाच्या शुभ दिवशी पवित्र ज्ञानतीर्थप्रवर्तनाच्या कार्याचा शुभारंभ केला.
मुलांच्या सोबत मुलींनाही गुरुकुल युक्त नैतिक, आध्यात्मिक, धार्मिक शिक्षण मिळावे याकरिता 1933 साली श्री कंकुबाई श्राविकाश्रम कारंजा या गुरुकुलाचा शुभारंभ करण्यात आला.
बाहुबली : गुरुदेवश्रींचे दिव्यस्वप्न
कोल्हापूर जिल्ह्यातील श्री अतिशय क्षेत्र बाहुबली येथे सुमारे ११५६ साली पहाडावर भगवान बाहुबली यांची महामूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. आज पासून सुमारे चारशे वर्षांपूर्वी निर्वाण बाबा बाहुबली हे एक तपस्वी मुनिराज या ठिकाणी तपश्चर्या करीत होते. यांच्या तपाने प्रभावित होऊन निर्वाण बाबा बाहुबलीचा पहाड असे याचे नामकरण झाले होते. तसेच 1914 साली पंडितश्री कल्लाप्पांना निटवे शास्त्री यांनी विशालकाय धर्मशाळा बांधली होती; म्हणूनच कोल्हापूर परिसरातील श्रावक आणि विशेष करून कोल्हापूर येथील लक्ष्मीसेन व जिनसेन भट्टारक यांच्या आग्रहास्तव गुरुदेवश्री समंतभद्र महाराज यांनी दिनांक 13 जुलै 1934 रोजी श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम या गुरुकुल शिक्षण संस्थेची संस्थापना केली. त्यानंतर आपले आद्य गुरु चारित्रचक्रवर्ती आचार्य श्री शांतिसागर महाराज यांच्या आज्ञेवरून 28 फूट उंचीची विशालकाय भगवान बाहुबली यांची महामूर्ती 1963 साली प्रतिष्ठापित केली आणि हळूहळू या गुरुकुल शिक्षण संस्थेचा विस्तार होत गेला. आज हे एक पावन वंदनीय तीर्थधाम व ज्ञानतीर्थ प्रवर्तनाचे आध्यात्मिक केंद्र बनले आहे. 1963 साली श्री बाहुबली विद्यापीठ या संस्थेची स्थापना करण्यात आली आणि गुरुकुल शिक्षणाची गंगोत्री गावोगावी पसरविण्याचा प्रयत्न केला.
आज या बाहुबली क्षेत्रावरून श्री बाहुबली ब्रमह्मचर्याश्रम या गुरुकुलासह पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम स्तवनिधी, श्री भरतेश गुरुकुल बेल्लद बागेवाडी, श्री जिनसेनाचार्य गुरुकुल तेरदाळ या चार गुरुकुलांचे संचालन केले जाते. तसेच महाराष्ट्रात बाहुबली, जयसिंगपूर, अकिवाट, तारदाळ, निमशिरगाव, टाकळीवाडी आणि कवठेसार या ठिकाणी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण दिले जात आहे तर कर्नाटकात स्तवनिधी, तेरदाळ, बागेवाडी, सिदनाळ व अकोळ या ठिकाणी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण दिले जात आहे.
गुरुकुल शाखांचा विस्तार : गुरुदेवश्रींचे खरे स्मारक
1918 साली कारंजा येथे श्री महावीर ब्रम्हचार्याश्रम, 1933 साली कारंजा येथे श्री कंकुबाई श्राविकाश्रम, 1934 साली बाहुबली येथे श्री बाहुबली ब्रह्मचार्याश्रम, 1939 साली स्तवनिधी येथे श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम, 1940 साली श्री दिगंबर जैन गुरुकुल सोलापूर, 1941 साली गजपंथ येथे श्री गजपंथ ब्रह्मचर्याश्रम, 1944 साली खुरई (मध्य प्रदेश) येथे श्री पार्श्वनाथ जैन गुरुकुल, 1944 साली कारकल कर्नाटक येथे श्री भुजबली ब्रह्मचर्याश्रम, 1959 साली बेल्लद बागेवाडी येथे श्री भरतेश गुरुकुल, 1962 साली वेरूळ येथे श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम, 1963 साली बाहुबली येथे श्री बाहुबली विद्यापीठ, 1966 साली तेरदाळ येथे श्री जिनसेनाचार्य गुरुकुल, 1972 साली कुंथलगिरी येथे श्री देशभूषण कुलभूषण ब्रह्मचर्याश्रम या गुरुकुलाची पून: स्थापना केली. याशिवाय सोलापूर, बारामती, कोल्हापूर, सांगली येथील व या परिसरातील अनेक संस्थांच्या संचालनास सुयोग्य मार्गदर्शन केले.
सामाजिक योगदान
1955 ते 1985 हे गुरुदेवश्रींच्या सामाजिक कार्याचे सुवर्णयुगच होय. खरोखर ते एक थोर समाजशास्त्रज्ञ होते. बहुबली क्षेत्रावरून दक्षिण भारतीय दिगंबर जैन महासभेची स्थापना करून त्याच्या माध्यमाने खूप मोठी सामाजिक चळवळ उभी केली. प्रामुख्याने शिक्षण - प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणे, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घेणे, पाठशाळा व धर्म परीक्षांचे आयोजन करणे, णमोकार महामंत्राची जागृती करणे, जैन लोकांची जनगणना करणे, विविध व्याख्यानमाला व प्रवचनांचे आयोजन करणे, विशेष करून तरुण वर्गात निर्व्यसनीपणा अंगी बनविणे, जैन धर्माचे संरक्षण व संवर्धन यासाठी प्राचीन मंदिरांचे जीर्णोद्धार करणे आणि हस्तलिखितांचे पांडूलिपीचे संरक्षण करणे असे बहुआयामी कार्य केले आहे. याशिवाय आरोग्यधाम व रसशाळा निर्माण करून त्यागी- व्रती लोकांच्या प्रमाणेच परिसरातील गोरगरिबांना औषधोपचार मिळवून देणे आणि भारतीय उपचार पद्धती आयुर्वेद याचे महत्त्व वाढविणे यासाठी त्यांनी अपार कष्ट उपसले. जीवदयेचा प्रचार केला व बलिप्रथाविरोधी कायदा अमंलात यावा यासाठी आटोकाट प्रयत्न केले. ते वीर सेवा दलाचे प्रेरणा स्रोत होते. वीर देवा वीर सेवा दलाच्या एकूण 11 शाखा होत्या. त्यावरून त्यांनी 116 पर्यंत शाखा निर्माण करण्यास सातत्याने पाठपुरावा केला. किंबहुना कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जैन समाज असलेल्या 700 गावात वीर सेवा दलाच्या शाखा असाव्यात असा त्यांनी आपले प्रिय शिष्य वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्यासमोर दृढनिश्चय व्यक्त केला होता.
धार्मिक योगदान
गुरुदेवश्री हे खऱ्या अर्थाने माणसं घडविणारे देवमाणूस होते. त्यांनी स्वतः आयुष्यभर जैन धर्माचा प्रचार - प्रसार व आत्मसाधना याकरिता ध्यान व स्वाध्याय या कार्यामध्ये स्वतःला झोकून घेतले होते; म्हणून त्यांनी इतरांनाही अशाच प्रकारचे जीवन जगण्यास प्रेरित केले. त्यागमय जीवनाचे ते एक प्रेरणास्थान होते. व्रती श्रावकांची पेरणी करणे हा त्यांचा जन्मजात स्वभावच होय. तीर्थरक्षाशिरोमणी मुनिश्री 108 आर्यनंदीजी महाराज , समाधी सम्राट मुनिश्री 108 महाबल महाराज, आर्यिका 105 श्री सुप्रभामती माताजी, क्षुल्लक जयभद्र महाराज, क्षुल्लक 105 वीरभद्र महाराज, क्षुल्लक 105 यशोभद्र महाराज, क्षुल्लक 105 श्री विजय भद्र महाराज यांना त्यांनी दीक्षा दिली; म्हणून ते एका अर्थाने आचार्यच होते. याशिवाय शेकडो व्रती कार्यकर्त्यांना आजन्म बालब्रह्मचर्यव्रतपालन करण्यास प्रोत्साहन दिले. त्यामध्ये ब्रह्मचारी माणिकचंदजी चवरे तात्या गुरुजी, ब्रह्मचारी माणिकचंद भीसीकर गुरुजी, ब्रह्मचारी वालचंद गुरुजी, गुरुकुल माता गजाबेन, ब्रह्मचारी माणिकचंदजी मोहोळकर गुरुजी, ब्रह्मचारी अजित कुमार करके गुरुजी, ब्रह्मचारी भूपाल दलाल गुरुजी, ब्रह्मचारी बाबुराव पाटील गुरुजी, ब्रह्मचारी श्रीधर मगदुम अण्णा, ब्रह्मचारी यशपाल जैन अण्णा, ब्रह्मचारी बाबासाहेब कुचनुरे, ब्रह्मचारी डॉक्टर सुजाताताई रोटे, ब्रह्मचारी देवचंद जोहरापूरकर, गुरुजी, ब्रह्मचारी आ. भा. सोनटक्के गुरुजी, ब्रह्मचारी मृत्युंजय मालगावे गुरुजी, ब्र. धन्यकुमार बेलोकर, पद्मश्री ब्र. सुमतीबाई शहा, ब्र. प्रेमचंद देवचंद शहा, ब्र. जयकुमार भीसीकर गुरुजी अशी काही नाव घेण्यासारखे आहेत की ज्यांनी आपले संपूर्ण जीवन धर्मासाठी वाहिले.
शिरपूर येथील तीर्थक्षेत्राची दुर्दशा पाहून संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्रांच्या संरक्षणासाठी त्याकाळी (१९८०च्या सुमारास) एक कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याचा त्यांनी संकल्प केला. याची पूर्तता त्यांचे भद्रशिष्य मुनिश्री आर्यनंदी महाराज व मुनिश्री महाबल महाराज यांनी केली. याशिवाय त्यागी लोकांच्या ज्ञान, ध्यान व स्वाध्यायासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देणे, श्रावकांच्यासाठी स्वाध्याय प्रसारक मंडळांची स्थापना करणे, धार्मिक शिक्षण शिबिरांचे आयोजन करणे, पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव, महामस्तकाभिषेक, वेदीप्रतिष्ठा, विधान, पूजन, विचारसंगोष्टी, योगासन प्रशिक्षण शिबिर इत्यादी धार्मिक उपक्रमाद्वारे त्यांनी खूप मोठी जैन धर्माची प्रभावना केली.
साहित्यिक योगदान
पत्रवाड़्मय योगदान - सन 1929 ते 1938 या बारा वर्षाच्या काळात त्यांनी हजारो पत्र लिहिली. त्यापैकी निवडक दोनशे पत्रांचा संग्रह पत्र पीयूष या नावाने प्रकाशित आहे. तर 1938 ते 1988 या पन्नास वर्षातील अनेक सन्मार्गप्रेरक पत्रे अप्रकाशित आहेत. केवळ कारंजाला लिहिलेली अनेक पत्रे आहेत. त्यापैकी सुमारे आठ हजार पत्रांचा संग्रह ब्र. माणिकचंद चवरे यांनी केलेला आहे. या पत्रांच्या माध्यमातून आधुनिक गुरुकुल शिक्षण पद्धतीला सक्षम करणे, तत्कालीन परिस्थितीचे भान करून देणे, मुलांना व कार्यकर्त्यांना धार्मिक, आध्यात्मिक, नैतिक, जैन तत्वज्ञान, शैक्षणिक अधिष्ठान, सामाजिक व व्यक्तिगत विपरीत मान्यतांचे निराकरण याविषयीचे उद्बोधन व सत्प्रेरणा दिसते. अनेक सुविचारांनी भरलेली ही पत्रे सर्वगुणसंपन्न, व्यावहारिक चातुर्य, संघटन कौशल्य, जैनतत्त्वावर अफाट श्रद्धा, वाणीतील माधुर्य, स्वपरोपकाराची जीवनवृत्ति इत्यादी अनंत गुण यामधून दिसून येतात.
सन्मती मासिकाचे प्रेरणा स्रोत - ब्र. माणिकचंद भीसीकर गुरुजी यांना जैन गुरुकुल शिक्षण पद्धती व जैनतत्त्वाच्या प्रचार प्रसार करीता हे एक मासिक सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार ब्र. भीसीकर गुरुजी यांनी 15 ऑगस्ट 1950 पासून हे मासिक सुरू केले. त्या मासिकाची कन्नड भाषेतील आवृत्ती ही निघत होती. ती 1955 ते 1985 या कालखंडात प्रकाशित होत होती.
अनेक लेखकांचे निर्माता - गुरुकुलामध्येच बालमनावर लेखन व वाचनकलेचे संस्कार करून अनेक विद्यार्थ्यांना लेखन, संपादन, संशोधन करण्यास त्यांनी प्रेरित केले. तसेच अनेक ताडपत्र, हस्तलिखितावरील पांडूलिपी ग्रंथांचे संकलन केले. जैन धर्मातील तत्त्वांची वर्तमानकालीन उपयोगिता स्पष्ट करण्यासाठी संशोधन करण्यास अनेकांना प्रेरणा दिली. इतकेच नव्हे तर अनेकांत शोधपीठ या नावाने एक स्वतंत्र संशोधनात्मक ग्रंथालय निर्माण केले.
ग्रंथ प्रकाशन - जैन धर्मातील तत्त्वज्ञानाच्या प्रचार-प्रसारासाठी आणि जैन संस्कृतीच्या संवर्धन व संरक्षणासाठी सत्साहित्याचे प्रकाशन करणे, अत्यंत आवश्यक असते त्यानुसार त्यांनी श्री महावीर आश्रम मुद्रणालय कारंजा (१९३१), कंकुबाई धार्मिक पाठ्यपुस्तक माला कारंजा (१९३१), श्री महावीर ज्ञानोपासना समिती कारंजा (१९५२), जीवराज जैन ग्रंथमाला सोलापूर (१९५१), सन्मती प्रकाशन बाहुबली (१९५५), अनेकांत शोधपीठ बाहुबली (१९८३) अशा अनेक प्रकाशन संस्था निर्माण केल्या आणि या संस्थांच्याद्वारे हजारो पुस्तकांचे प्रकाशन करविले. तसेच प्रत्येक गुरुकुलामध्ये सत्साहित्याचे विक्री केंद्र सुद्धा त्यांनी उभारले होते.
-डॉ. नेमिनाथ शास्त्री बाहुबली
#SamantbhadraJiMaharaj1891VardhamanSagarji(ShantiSagarji)
आचार्य श्री १०८ समन्तभद्रजी महाराज
आचार्य श्री १०८ वर्धमान सागरजी महाराज १९५१ (शांतिसागरजी) Acharya Shri 108 Vardhaman Sagar Ji Maharaj (Shantisagarji)
Sanjul Jain on 01-Jan-2021 created wiki page for Acharya Shri
VardhamanSagarJiMaharaj(ShantiSagarji)
Acharya Shri 108 Samantbhadra Maharaj ji was born on 19 December 1891 in Karmole,Dist-Solapur,Maharashtra.His name was Devchand Kasturchand Shah in Planetary state. He received initiation from Muni Shri 108 Vardhaman Sagar ji Maharaj(South)(Elder brother of Acharya Shri Shanti Sagar ji).
आप मौन साधक थे।आपने युवक जीवन कल्याण के लिए कई आश्रम की स्थापना कराई थी।कारंजा,कुम्भोज ,खुरई गुरुकुल में आज भी बाल्याश्रम चल रहे हैं जहाँ से संस्कार और प्रतिभा प्रदान की जाती है।
Acharya Shri 108 Devendra Kirti Ji Maharaj | ||
1.Charitrachakravarti Acharya Shri Shanti Sagar Ji Maharaj 1872 | ||
Acharaya Vardhaman Sagarji Maharaj (ShantiSagarji) |
Book-Jain Digamaberacharya Sant Avam Sadvichar
Acharya Shri 108 Samantbhadraji Maharaj
आचार्य श्री १०८ वर्धमान सागरजी महाराज १९५१ (शांतिसागरजी) Acharya Shri 108 Vardhaman Sagar Ji Maharaj (Shantisagarji)
आचार्य श्री १०८ वर्धमान सागरजी महाराज १९५१ (शांतिसागरजी) Acharya Shri 108 Vardhaman Sagar Ji Maharaj (Shantisagarji)
Karmole(Sholapur)
Sanjul Jain on 01-Jan-2021 created wiki page for Acharya Shri
#SamantbhadraJiMaharaj1891VardhamanSagarji(ShantiSagarji)
VardhamanSagarJiMaharaj(ShantiSagarji)
VardhamanSagarJiMaharaj(ShantiSagarji)
1000
#SamantbhadraJiMaharaj1891VardhamanSagarji(ShantiSagarji)
SamantbhadraJiMaharaj1891VardhamanSagarji(ShantiSagarji)
You cannot copy content of this page